जवाहर कॉलनीत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे त्यागमूर्ती रमाईंना भावपूर्ण अभिवादन..बाबासाहेब घडले, कारण माता रमाई झिजल्या जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-विश्वभूषण,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि बाबासाहेबांच्या ध्येयासाठी समर्पित करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जवाहर कॉलनी येथे ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ (RPM) पक्षाच्या वतीने माता रमाई यांच्या स्मृतीस अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मानसी म्हस्के यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचा जयघोष करत त्यांना मानाचा मुजरा केला.याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी माता रमाई यांच्या अथांग त्यागाला आणि मूक सेवेला उजाळा दिला.ते म्हणाले, “डॉ.बाबासाहेबांना ‘महामानव’ बनवण्यामागे माता रमाईंचा सिंहाचा वाटा होता.बाबासाहेब घडले,कारण रमाई स्वतः झिजल्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,अनेकदा स्वतः उपाशी राहून आणि अपार कष्ट उपसून त्यांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणाचा यज्ञ अविरतपणे चालू ठेवला.त्यांच्या या अलौकिक त्यागाची किंमत कधीच मोजता येणार नाही.”
पुढे बोलताना गवळे म्हणाले की, “आज ‘आरपीएम’चा प्रत्येक कार्यकर्ता माता रमाई यांच्या याच त्यागातून आणि संघर्षातून प्रेरणा घेत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध असून, रमाईंचे विचार हीच आमची खरी ऊर्जा आहे.या अभिवादन सभेला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने राज्य सहसचिव वैभव लोखंडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे,जिल्हा सचिव रवि मोरे आणि ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे यांनी उपस्थित राहून माता रमाई यांच्या समाजकार्याचा गौरव केला.
याशिवाय पूर्व शहराध्यक्ष राहुल खरात,शहर संघटक फईम शेख, सुनील वाहुळ,राजकुमार साळवे, विशाल गाडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून माता रमाई यांच्या संघर्षमय प्रवासाचे स्मरण करत आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचा समारोप माता रमाई यांच्या चरणी आदरांजली वाहून करण्यात आला.
