निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याची पूर्वतयारी वेगात..काकडवाडी येथे पालखी मार्गाची संस्थानकडून पाहणी..रयतचे तालुकाध्यक्ष व पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या सामाजिक कार्याचा ‘माऊलींच्या दरबारात’ बहुमान..!
संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर,वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री.निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान (त्र्यंबकेश्वर) च्या वतीने संगमनेर तालुक्यातील काकडवाडी हद्दीतील पालखी मार्ग आणि रस्ता दुरुस्तीच्या कामाची नुकतीच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. हा पालखी सोहळा सुखकर व्हावा यासाठी संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.या पाहणी दौऱ्यादरम्यान काकडवाडी येथील प्रसिद्ध पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष दत्तात्रय घोलप यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि जनहिताच्या कार्याची दखल घेत संस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व कौतुक करण्यात आले.
🗓️ ६ जुलै रोजी ‘निवृत्तीनाथ माऊलींची’ पालखी काकडवाडीत दाखल होणार..!
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा आषाढी पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.६ जुलै २०२६ रोजी सकाळी हा सोहळा काकडवाडी (ता. संगमनेर) येथे दाखल होईल.या पार्श्वभूमीवर गावचे नियोजन,सुरक्षितता आणि वारकऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी संस्थानच्या शिष्टमंडळाने काकडवाडीला भेट दिली.यावेळी संस्थानच्या वतीने ग्रामस्थांना पालखी सोहळ्याची अधिकृत निमंत्रण पत्रिकाही सुपूर्द करण्यात आली.
🍲 ग्रामस्थांकडून महाप्रसादाची जय्यत तयारी
काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी आणि भाविकांसाठी सकाळच्या भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजनाबाबत ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून,प्रशासकीय स्तरावर रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी संस्थानने सूचना केल्या आहेत.
🤝 पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे,काकडवाडी परिसराचे नाव सामाजिक क्षेत्रात मोठे करणारे पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या कार्याचा झालेला गौरव! घोलप हे केवळ पत्रकारितेच्या माध्यमातूनच नव्हे,तर ‘रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष’ आणि ‘संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष’ म्हणून सातत्याने शेतकरी,कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढत असतात.त्यांच्या याच निरपेक्ष सामाजिक कार्याची दखल घेत संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल महाराज साळुंखे आणि विश्वस्त ह.भ.प. नवनाथ महाराज गांगर्डे यांनी दत्तात्रय घोलप यांचे जाहीर कौतुक केले.संतांच्या भूमीत सर्वसामान्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगत घोलप यांच्या भावी सामाजिक वाटचालीस संस्थानच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
👥 यांची होती प्रमुख उपस्थिती:
पालखी मार्ग पाहणी आणि नियोजन बैठकीच्या वेळी वारकरी संप्रदायातील अनेक प्रमुख चेहरे उपस्थित होते:ह.भ.प. राहुल महाराज साळुंखे (अध्यक्ष, श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर),ह.भ.प. नवनाथ महाराज गांगर्डे (विश्वस्त) ह.भ.प. सागर दौंड (चोपदार) श्री.ज्ञानेश्वर माऊली दाते (वारकरी प्रतिनिधी),श्री. संदीप गांगर्डे व इतर विश्वस्त मंडळ.या प्रसंगी काकडवाडी परिसरातील ग्रामस्थ,भजनी मंडळ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारकरी आणि संतांच्या आगमनाने संपूर्ण काकडवाडी परिसरात आतापासूनच भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
