वारकरी संगीत भूषण पुरस्कार प्राप्त जगन्नाथ बोठे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन..वाळकी परिसरावर शोककळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक,प्रगतीशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडुजी बोठे पाटील (वय ९०) यांचे शनिवारी (ता.२३) वाळकी येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह वारकरी आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पंचक्रोशीत ‘जगन्नाथतात्या’ या नावाने अत्यंत आदराने ओळखल्या जाणाऱ्या तात्यांनी आयुष्यभर संगीत,शेती आणि अध्यात्माची त्रिवेणी सांगड घालत अनेकांचे जीवन समृद्ध केले.कै.जगन्नाथ बोठे पाटील हे जुन्या काळातील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होते.१९६६ च्या सुमारास त्यांनी संगीत क्षेत्रातील मानाची ‘संगीत विशारद’ ही पदवी संपादन केली होती.त्या काळात ही पदवी मिळवणारे ते वाळकी आणि परिसरातील एकमेव कलावंत होते.केवळ स्वतःपुरते संगीत मर्यादित न ठेवता,त्याचा ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा या ध्यासाने ते झपाटलेले होते.यासाठी त्यांनी तब्बल ५० वर्षे पंचक्रोशीतील हौशी तरुणांना:शास्त्रीय संगीत आणि भजनकला टाळ,तबला आणि मृदंग वादन
हार्मोोनियम (पायपेटी) वादन
यांचे कोणतेही शुल्क न घेता मोफत शिक्षण दिले.त्यांच्या या मोहीमेमुळे ग्रामीण भागात अनेक उत्तम भजनी मंडळ आणि वादक तयार झाले.राष्ट्रीय पुरस्काराने गौरव संगीत आणि वारकरी संप्रदायातील त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.सन २०१४ मध्ये पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाडा पटांगणात पंडित यादवराज फड यांच्या विशेष पुढाकाराने ९ वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन पार पडले होते.या भव्य सोहळ्यात जगन्नाथ बोठे पाटील यांना ‘वारकरी संगीत भूषण’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.संगीत साधनेसोबतच तात्यांनी आपल्या शेतीत विविध नवनवीन प्रयोग करत एक प्रगतीशील शेतकरी म्हणून नाव कमावले होते. ‘काळ्या आईची सेवा’ आणि ‘विठ्ठल भक्ती’ हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. भागवत धर्माचे पाईक म्हणून त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा आणि विचारांचा प्रचार केला.समाजकारणात आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे जगन्नाथतात्या राजकीय घडामोडींपासून नेहमीच जाणीवपूर्वक अलिप्त राहिले.त्यांच्या साध्या,सरळ, निष्कलंक आणि मनमिळावू स्वभावामुळे समाजात त्यांच्याबद्दल एक वेगळे आदरयुक्त स्थान होते.जगन्नाथ बोठे पाटील यांच्या निधनाची वार्ता समजताच वाळकी व अहिल्यानगर परिसरातून शोक व्यक्त करण्यात आला.शनिवारी (ता.२३) वाळकी येथील त्यांच्या स्वमालकीच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुःखद प्रसंगी राजकीय,सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रातील अनेक मान्यवर,ग्रामस्थ आणि त्यांचा मोठा शिष्यवर्ग उपस्थित होता.प्रत्येकाच्या डोळ्यात तात्यांच्या आठवणींचे अश्रू होते.त्यांच्या पश्चात दोन मुल, एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा आणि सुविद्य परिवार आहे.ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ व वरिष्ठ पत्रकार ॲड.डॉ.बाळासाहेब बोठे पाटील,वाळकी येथील यशदीप गॅस एजन्सीचे संचालक प्रा. अनुपम बोठे पाटील,आणि वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग चे वडील होत.जगन्नाथतात्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक आदर्श मार्गदर्शक आणि संस्कारांची पाठशाळा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
