८ वर्षांनंतर शिवसैनिकांना मोठा दिलासा..! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतरच्या दगडफेक प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.. तब्बल ६०० जणांवरील संकट टळले..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-केडगाव येथील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार,दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्यासह तब्बल ६०० शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.सबळ पुराव्यांभावी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून,तब्बल आठ वर्षांनंतर शिवसैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.एप्रिल २०१८ मध्ये केडगाव येथे राजकीय वैमनस्यातून शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या दुहेरी हत्याकांडानंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती.हत्त्याकांडानंतर संतप्त जमावाने केडगाव परिसरात जोरदार दगडफेक केली,रस्ता रोको आंदोलन केले,तसेच पोलिसांना शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ६०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरवातीला लावले होते गंभीर कलम ३०८ घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी सुरुवातीला सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेचे (IPC) अत्यंत गंभीर कलम ३०८ लावले होते.मात्र, त्यानंतर झालेल्या सखोल तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळले आणि इतर वाढीव कलमे लावली.यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते.या कारवाईनंतर शिवसेनेचे तत्कालीन आक्रमक नेते आणि माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला होता.“केडगावमधील दगडफेक ही शिवसैनिकांनी केलेली नव्हती, तर मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती,” असा दावा त्यांनी केला होता.शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी राजकीय दबावापोटी किंवा घाईघाईत खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.न्यायालयाच्या आजच्या निकालाने अनिलभैय्यांचा तो दावा एकप्रकारे खरा ठरल्याची भावना आता शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.
खटल्याच्या प्रवासात ‘भैय्यांचे’ छत्र हरपले
हा खटला न्यायालयात सुरू असतानाच, २०२० मध्ये संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाच्या साथीमध्ये शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांचे दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या निधनानंतरही कायदेशीर लढाई सुरूच होती.अखेर आज न्यायालयाने या प्रकरणावर पडदा टाकत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या खटल्यामध्ये आरोपींच्या वतीने ॲड.रक्ताटे आणि ॲड.ढापसे यांनी मजबूत बाजू मांडली आणि पोलिसांचे आरोप न्यायालयात टिकू शकले नाहीत.न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या शेकडो शिवसैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
