मनसे सुपा गटप्रमुखपदी प्रतीक शेळके यांची नियुक्ती…तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान..सुपा उड्डाणपुल व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा मनसेचा निर्धार
सुपा (प्रतिनिधी):-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.नयन कदम यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष श्री.सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली,म्हसणे (सुलतानपूर) येथील श्री.प्रतीक शेळके यांची मनसेच्या सुपा गट प्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.पारनेर तालुकाध्यक्ष श्री.अविनाश पवार यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी मनसे पारनेर तालुका सचिव श्री. नारायण नरवडे,तालुका उपाध्यक्ष श्री.वीरेंद्र थोरात, पारनेर शहराध्यक्ष श्री.सतीश म्हस्के,सुपा शहराध्यक्ष श्री. अक्षय सूर्यवंशी,अजय पठारे, नितीन बागल यांच्यासह मनसेचे असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात सातत्यपूर्ण लढा देणार..!
नवनियुक्त गटप्रमुख प्रतीक शेळके यांनी मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले व सुपा गटातील जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अविनाश पवार आणि तालुका सचिव नारायण नरवडे म्हणाले की,“नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि सुपा येथील उड्डाणपुलाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मनसेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जाईल.महामार्ग वाहतूककोंडीतून मुक्त होईपर्यंत सर्व महाराष्ट्र सैनिकांना सोबत घेऊन मनसेचा हा लढा सुरूच राहील.”
“जनसेवा हीच खरी राजसेवा…”
“मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या ‘जनसेवा हीच खरी राजसेवा’ या विचाराने प्रेरित होऊन, सुपा भागात तालुकाध्यक्ष श्री. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आणि मनसेचा भगवा अधिक उंच नेण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.”
– प्रतीक शेळके (नवनियुक्त मनसे सुपा गट प्रमुख)
