कर्ज फेडण्यासाठी चैन स्नॅचिंग करणाऱ्या ‘भावड्या ‘ला तोफखाना पोलिसांकडून बेड्या..पाईपलाईनरोड वरील संस्कृती वाईन्स समोरील थरार..!मोबाईल हिसकावल्याचा प्रतिकार करताच गळ्यातील सोन्याची चैन तोडून आरोपी झाला होता पसार..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कर्जबाजारीपणाला कंटाळून थेट जबरी चोरीचा मार्ग पत्करणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (DB) ला मोठे यश आले आहे.पोलिसांनी आरोपीकडून १,८०,०००/- रुपये किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत केली आहे.योगेश उर्फ भावड्या अशोक गायकवाड (वय २९,रा.भगवान बाबा नगर, अहिल्यानगर,मूळ रा.शिंगवे तुकाई,ता.नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी संतोष विठ्ठलराव गुरळे (वय ४७, धंदा-व्यवसाय,रा.साईदीप नगर, शिरसाठ मळा,पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) हे दि.१३/०५/२०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील संस्कृती वाईन्स समोर उभे राहून आपल्या पत्नीशी मोबाईलवर बोलत होते.त्याच वेळी दारूच्या नशेत धुंद असलेला एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ आला आणि त्याने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.फिर्यादी संतोष गुरळे यांनी प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीकडून आपला मोबाईल परत हिसकावून घेतला. याचा राग आल्याने त्या दारुड्या इसमाने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने फिर्यादीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने तोडून घेतली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी संतोष गुरळे यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.जगदिश भांबळ यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. गुन्हे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांच्या अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीकडून आरोपीचे हुबेहूब वर्णन आणि परिसरातील गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी योगेश उर्फ भावड्या अशोक गायकवाड याला ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपी भावड्या गायकवाड याची कसून चौकशी केली असता,त्याने आपले कर्ज फेडण्यासाठीच ही चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.आरोपीने चोरलेल्या १५ ग्रॅम सोन्याच्या साखळीची लगड तयार केली होती.पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १,८०,०००/- रुपये किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे.
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुर्दशन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे (नगर शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.जगदिश भांबळ,पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलीस अंमलदार नितिन उगलमुगले,भानुदास खेडकर,अरुण गांगुर्डे,सुधीर खाडे,सुरज बाबळे,महिला पोलीस नाईक जिजा खुडे, सुमित गवळी,अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे, सतिष शिंदे,शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड,भागवत बांगर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांच्या पथकाने केली आहे.पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमधून तोफखाना पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.
