अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणा दरम्यान ‘स्मोक ग्रॅनेड’चा भीषण स्फोट ३ कर्मचारी जखमी!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नेहमीप्रमाणे अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण सत्र सुरू होते.प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांची आणि उपकरणांची माहिती दिली जात होती.अशातच,’स्मोक ग्रॅनेड’ (धूर सोडणारे ग्रॅनेड) बद्दल प्रात्यक्षिक दाखवत असताना,अचानक हातामध्येच या ग्रॅनेडचा मोठा स्फोट झाला.स्फोटाचा आवाज आणि अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे पोलीस मुख्यालयाच्या परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्दैवी अपघातात ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
घटनेची भीषणता पाहता, जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून,सर्व कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.“या गंभीर घटनेमुळे पोलीस दलातील प्रशिक्षणादरम्यानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.हा स्फोट नेमका ग्रॅनेडमधील तांत्रिक बिघाडामुळे झाला की तो हाताळताना झालेल्या चुकीमुळे झाला,याचा सखोल तपास आता पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.”
