समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालणारी आंतरजिल्हा दरोडेखोरांची टोळी जेरबंद..! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई..६ आरोपी अटक
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-समृद्धी महामार्गावर वाहने अडवून, चालकांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत लुटमार करणाऱ्या एका धोकादायक आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश केला आहे.या कारवाईत एका अल्पवयीन मुलासह ६ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून,गुन्ह्यात वापरलेल्या कार आणि मोबाईलसह एकूण ९ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या खळबळजनक दरोड्याची सुरुवात २७ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झाली.लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ट्रकचालक दत्ता बाबुराव राजुळे हे ट्रकमधून डिझेल घेऊन जात असताना,समृद्धी महामार्गावरील पोल क्र.५२९.९ जवळ ७ ते ८ जणांच्या टोळीने त्यांना गाठले.आरोपींनी राजुळे यांना लोखंडी रॉडने क्रूरपणे मारहाण करत डिझेल आणि रोख रकमेसह ७,४६५ रुपयांचा ऐवज लुटला.हा दरोडा टाकल्यानंतर टोळीचा थरार एवढ्यावर थांबला नाही.त्यांनी पुढे जात एका वॅगनआर कारला अडवले.कारचालक आणि त्याच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून,जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील १ लाख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड बळजबरीने काढून घेतली.त्यानंतर,याच टोळीने बिहार पासिंगच्या (BR 03 GB 4883) एका ट्रकला लक्ष्य केले. त्याच्या चालकाला मारहाण करून १५० लिटर डिझेल आणि रोख ४,१०० रुपये असा १८,९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.एकाच दिवशी ३ वाहनांवर दरोडा टाकून टोळीने एकूण १,५०,४१५ रुपयांची लूट केली होती.या गंभीर घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.पोलीस अधीक्षकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले.त्यानुसार,पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि महादेव गुट्टे,पोलीस अंमलदार विजय पवार,फुरकान शेख,भिमराज खर्से,राहुल डोके,सतिष भवर, रोहित येमुल,सुनिल मालणकर, प्रशांत राठोड,प्रमोद जाधव आणि महादेव भांड यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले.तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादींनी दिलेल्या आरोपींच्या वर्णनावरून माग काढण्यास सुरुवात केली. १ जून २०२६ रोजी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील काही आरोपी जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात लपलेले आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अंबड येथून दोघांना ताब्यात घेतले:
१) निखील बद्रीनारायण गोरे (वय १९, रा. नुतन वसाहत, अंबड, जि. जालना)
२) एक विधीसंघर्षीत बालक (वय १७ वर्षे) या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या इतर साथीदारांची नावे उघड केली.त्यानुसार पोलिसांनी २ जून २०२६ रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे धाड टाकून उर्वरित ४ आरोपींनाही झडप घालून अटक केली:
३) शिवनाथ शांताराम आव्हाड (वय २४, रा. शिर्डी, मूळ रा. जातेगाव टेमभी, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)
४) ओम बालाजी खरात (वय १९, रा. जालना, हल्ली रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर)
५) राहुल साधाकिसन कोकाटे (वय २३, रा. पांग्रा, पैठण, मूळ रा. रांजणगाव, बदनापूर, जि. जालना)
६) साईराज गणेश शहाणे (वय २१, रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर)
कार आणि मोबाईल जप्त; इतर ३ साथीदारांचा शोध सुरू
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून दरोडा टाकताना आणि पळून जाण्यासाठी वापरलेली व्हेरना कार, स्विफ्ट कार,६ महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९,२८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या दरोड्यात त्यांच्यासोबत आणखी तीन इसम सामील होते, अशी माहिती दिली आहे. पोलीस आता त्या ३ फरार आरोपींचा शोध घेत आहेत.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१०(२), ११८(१), ३५१(१), ३५२ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २२७/२0२६) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फत्ते केली.
