एमआयडीसीतील नामांकित कंपनीला मध्यरात्री लुटणारा ‘तो’ अट्टल भामटा अखेर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-येथील नागापूर एमआयडीसी परिसरातील नामांकित ‘मॅट्रिक्स इंजिनिअरिंग टेक्निक्स’ कंपनीत झालेल्या धाडसी चोरीचा एम.आय.डी.सी. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने छडा लावला आहे.गुप्त बातमीदाराने दिलेल्या एका अचूक टीपने पोलिसांना थेट आरोपीच्या दारापर्यंत पोहोचवले आणि अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे तुषार अशोक सोनवणे (वय ३२ वर्षे, रा.कसबे वस्ती तपोवन रोड, ता.जि.अहिल्यानगर) यांनी रीतसर फिर्याद दिली होती.दि. २१/०६/२०२६ रोजी रात्री २०.३० वाजता ते दि. २२/०६/२०२६ रोजी सकाळी ०८.३० वाजताचे दरम्यान, नागापूर एम.आय.डी.सी. येथील ‘मॅट्रिक्स इंजिनिअरिंग टेक्निक्स’ कंपनीचे समोर ठेवलेले २०,८००/- रुपये किमतीचे WA Plate with LHS व RHS जॉबचे पार्ट व ३,०००/- रुपये किमतीच्या दोन ट्रॅकिंग बॅग असा एकूण २३,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ४९०/२०२६ भा. न्या. सं. का. क. ३०३(२) प्रमाणे दि. २९/०६/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची तपासाची चक्रे फिरली:गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.हेमंत थोरात यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभारी अधिकारी हेमंत थोरात यांनी त्यांचे अधीनस्थ अधिकारी व तपास पथकास सविस्तर सूचना व योग्य मार्गदर्शन केले.सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती घेत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली.या चोरीचा गुन्हा हा ऋषीकेश बद्रीनाथ गायकवाड (वय २२ वर्षे,रा.दरंदले गल्ली,सोनई, ता.नेवासा,जि.अहिल्यानगर) यानेच केला असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांच्या खाक्या दाखवताच आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपीकडून गुन्ह्यातील एकूण २३,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल,ज्यामध्ये २०,८००/- रुपये किमतीचे WA Plate with LHS व RHS जॉबचे पार्ट व ३,०००/- रुपये किमतीच्या दोन ट्रॅकिंग बॅग दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.संदीप पवार हे करीत आहेत.सदरची उत्कृष्ट कामगिरी श्री.मुम्माका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि हेमंत थोरात,सफ़ो. राकेश खेडकर,पोहेकॉ.संदीप पवार,पोहेकॉ.शैलेश रोहोकले, पोहेकॉ.राजू सुद्रिक,पोकॉ.दिपक फुंदे, पोकों.नवनाथ दहिफळे,पोकों किशोर जाधव,पोकों राहुल गुंडू,पोकों अरुण सांगळे यांनी केलेली आहे.
