धक्कादायक: प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा तीव्र संताप; थेट ग्रामपंचायत दारात आणून टाकल्या मृत कोंबड्या!चिंचोली गुरवमध्ये दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त नागरिकांचे खळबळजनक ‘अनोखे आंदोलन’!
संगमनेर (विशेष प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील रांजणगाव देशमुख रोड,तळेगाव दिघे,वावी रोड तसेच पारेगाव बुद्रुक रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर मृत कोंबड्या उघड्यावर फेकल्या जात आहेत.या मृत कोंबड्या सडल्यामुळे परिसरात असह्य अशी तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मुख्य रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. परिसरात राहणारे रहिवासी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा अत्यंत विपरीत परिणाम होत असून,गावात मोठी साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतीचे ‘ढिम्म’ प्रशासन; नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली
या जीवघेण्या समस्येबाबत चिंचोली गुरव येथील ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. उघड्यावर मृत कोंबड्या टाकणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांवर किंवा संबंधितांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली होती.मात्र,ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
संतापाचा कडेलोट;थेट कार्यालयाचे प्रवेशद्वार गाठले!
प्रशासनाच्या या कथित ढिम्म आणि बेजबाबदार कारभाराला कंटाळून अखेर अज्ञात संतप्त नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी थेट मृत कोंबड्या गोळा करून चिंचोली गुरव ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य गेटसमोर आणून टाकल्या. सकाळी हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि ग्रामपंचायत प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली.
💬 संतप्त ग्रामस्थांची प्रतिक्रिया:
गावात मृत कोंबड्यांमुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.लहान मुले आणि वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत.अनेक वेळा तक्रारी करूनही कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापातून हा प्रकार घडला आहे.प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस कारवाई करावी.”
आता तरी प्रशासन जागे होणार का?
या घटनेमुळे गावातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आता या धक्कादायक प्रकारानंतर तरी ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होऊन या मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावणार का? तसेच उघड्यावर मृत कोंबड्या टाकून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
