मुंडण आंदोलनाचा इशारा देताच PWD प्रशासन हादरले..!पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ यांच्या तक्रारीनंतर ‘त्या’ ३ बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):-सार्वजनिक बांधकाम मंडळ,अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या संगमनेर उपविभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मागणीवरून सध्या जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण कमालीचे तापले आहे.संगमनेर येथील कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे,संगमनेर येथील उपविभागीय अभियंता के.बी. गुंजाळ आणि श्रीरामपूर येथील उपविभागीय अभियंता श्री. वराळे यांच्या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष श्री. संतोष गोरख मोकळ यांनी या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्या राहत्या घरासह इतर जिल्ह्यात तात्काळ बदली करण्यात यावी,अशी मागणी करणारा तक्रार अर्ज दाखल केला होता.केवळ अर्जच नाही,तर या मागणीसाठी त्यांनी १ जून २०२६ पासून तीव्र मुंडण आंदोलन करण्याचा थेट इशारा प्रशासनाला दिला होता.या आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे प्र.कार्यालयीन अधीक्षक तथा अधीक्षक अभियंता श्री.कि.टी. माळी यांनी संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांना अधिकृत जा.क्र. प्रलि/ १८८४ / सन २०२६ अन्वये लेखी आदेश जारी केले आहेत.
शासकीय पत्रातील मुख्य मुद्दे:
सखोल चौकशी
संतोष गोरख मोकळ यांच्या तक्रार अर्जाची छायांकित प्रत जोडून,या प्रकरणाची तातडीने चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल मुख्य मंडळ कार्यालयास सादर करावा.
आंदोलनापासून परावृत्त करा
तक्रारदार यांनी १ जून २०२६ पासून जाहीर केलेले मुंडण आंदोलन करू नये,यासाठी त्यांची समजूत काढून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे.
कारवाईचा अहवाल
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने काय कारवाई केली,याचा अहवाल देखील तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बांधकाम विभागात खळबळ!
या वरिष्ठ पातळीवरील पत्रव्यवहारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या प्रचंड खळबळ उडाली असून,या चौकशीत काय निष्पन्न होते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
