१५० ग्रॅम ‘ते’ पांढरं पाकीट आणि शहरात खळबळ! ‘एमडी’ ड्रग्ज असण्याची दाट शक्यता..३ संशयित आरोपी तोफखाना पोलिसांकडून गजाआड..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याने केलेल्या एका धडक कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला खंडणीच्या उद्देशाने गाठणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. मात्र,या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून जे जप्त केले,त्याने खुद्द पोलीस प्रशासनालाही धक्का बसला आहे आहे.आरोपींकडून तब्बल १५० ग्रॅम वजनाची संशयास्पद पांढरी पावडर जप्त करण्यात आली असून,यामुळे शहरात ड्रग्जचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली ही पावडर ‘एमडी’ (मेफेड्रोन) नावाचे उच्च दर्जाचे अमली पदार्थ असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृत भाष्य करणे टाळले असून, संशयित पावडर रासायनिक विश्लेषणासाठी (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
१५० ग्रॅम एमडी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत लाखांच्या घरात असल्याने,हे नेटवर्क नेमके कुठपर्यंत पसरले आहे, याबाबत आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा संशयास्पद अमली पदार्थ शहरात कुणासाठी आणला गेला होता? या दिशेने तोफखाना पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज माफियांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
