कौटुंबिक वादाचा इतका भयानक शेवट? पत्नीचा फरशीवर आपटून जीव घेऊन पळणाऱ्या पतीस नगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासातच असे केले गजाआड वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्याच पत्नीची डोके जमिनीवर आपटून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या भयंकर गुन्ह्यानंतर पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम पतीला नगर तालुका पोलिसांनी अत्यंत थरारक पाठलाग करून अवघ्या काही तासांत बीड जिल्ह्याच्या सीमेवरून बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,आरोपी सुभाष रखमाजी खरात (रा. तांबेमळा,बुरुडगाव, अहिल्यानगर) आणि त्याची पत्नी मनिषा सुभाष खरात यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे किरकोळ कौटुंबिक कारणावरून वाद होत असत. मात्र,रविवार,दि. १९/०७/२०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास (अंदाजे १२:३० वाजता) हा वाद विकोपाला गेला.रागाच्या भरात आरोपी सुभाष खरात याने मनिषा हिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
एवढ्यावरच न थांबता नराधम पतीने मनिषाचे डोके फरशीवर अत्यंत जोरात आपटले.या भीषण हल्ल्यात मनिषा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.घटना घडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत मनिषा यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र,दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी मनिषा यांचे भाऊ गणेश अशोक घोडके (वय ३० वर्षे, रा.सारसनगर, ता.जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) आणि ११५(२) अन्वये खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.गुन्हा केल्यानंतर आरोपी सुभाष खरात हा घटनास्थळावरून फरार झाला होता.तो जिल्ह्यातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच,पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ विशेष पथके रवाना करण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी हा बीड जिल्ह्याच्या दिशेने वेगाने पळून जात आहे.
माहिती मिळताच नगर तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बीड पोलीस स्टेशन हद्दीच्या सीमेवर धाव घेतली.पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि वेगाने हालचाली करत बीड सीमेवर आरोपी सुभाष रखमाजी खरात याला घेराव घातला आणि शिताफीने त्याला ताब्यात घेतले.अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकून पोलिसांनी कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्याची आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
ही उल्लेखनीय आणि धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत घुमार,पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,रायचंद पालवे, पोहेकॉ.मंगेश खरमाळे,नितिन शिंदे,चालक विकास शिंदे,शिवाजी खरात, तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू व अरुण सांगळे यांनी अत्यंत तत्परतेने आणि कौशल्याने ही कारवाई पूर्ण केली.आरोपीचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
