
अहमदनगर (दि.११ सप्टेंबर):-न्यायालयात पोटगीची केस दाखल केल्याच्या रागातून जावयाने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात घालून सितेवाडी फाटा ते जुन्नर रस्त्यावरील गणेशखिंड (ता.जुन्नर,पुणे) येथील दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लताबाई अरुण कडव (रा. शिवाजीनगर,कल्याण रस्ता) असे मयत महिलेचे नाव आहे.याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात जावई बाळू तुकाराम विधाते (रा.शिवाजीनगर, कल्याण रस्ता) याच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या पथकाने अटक केले.
याप्रकरणी मयत कडव यांचे दुसरे जावई अण्णा ढेरे (रा. बोल्हेगाव फाटा,नगर) यांनी फिर्याद दिली आहे.लताबाई व त्यांचा जावई बाळू हा पत्नी मुलाबाळांसह शिवाजीनगर, कल्याण रस्ता परिसरात राहतात.बाळू व त्याची पत्नी मिना यांचे लताबाई यांच्याशी मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. याप्रकरणी लताबाई यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. दरम्यान,३० ऑगस्ट रोजी लताबाई या त्यांचे मानलेले भाऊ शिवाजी काळे (रा. हिवरेझरे ता.नगर) यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या.त्या ३१ ऑगस्ट रोजी काळे यांच्या जवळच्याच शेतात रूईची पाने तोडण्यासाठी गेल्या असता तेथून बेपत्ता झाल्या होत्या.दरम्यान त्यांचा परिसरात शोध घेतला असता काळे यांच्या शेतातील रूईच्या झाडाजवळ लताबाई यांचा चष्मा व पायातील चप्पल व प्लास्टिकची गोणी तसेच फुटलेल्या बांगड्यांचे काचेचे तुकडे आढळून आले.तीन दिवस लताबाई यांचा शोध घेतल्या नंतरही त्या मिळून न आल्याने अखेर ४ सप्टेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या पथकाकडून लताबाई यांचा शोध सुरू असताना त्यांचा खून झाल्याचे समोर आले.त्यांचा जावई बाळू तुकाराम विधाते याने सासू लताबाईचा खून केल्याची कबुली दिली आहे.त्याच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना नगर तालुक्यात घडल्याने हा तपास नगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा उलगडा नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण,सफौ/दिनकर घोरपडे,पोहेकॉ/सुभाष थोरात,पोकॉ/कमलेश पाथरूट,राजु खेडकर,सागर मिसाळ,विक्रांत भालसिंग तसेच नगर दक्षिण मोबाईल सेल विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांच्या पथकाने केला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करत आहेत.