२ जानेवारी २०२४ पर्यंत सरसकट आरक्षणास दिला वेळ…आरक्षण मिळेपर्यंत घरी जाणार नाही मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
अंतरवाली सराटी (दत्तात्रय घोलप):-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला लढा आज यशस्वी होताना दिसत आहे.गेले आठ दिवसापासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.
त्यांची तब्येत जशी -जशी खालवत जात होती,तसा मराठी समाजामध्ये उद्रेक होत होता.आमदार खासदार पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली.जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून साखळी उपोषण, कॅन्डल मार्च, रस्ता रोको अशा प्रकारच्या आंदोलनांना सुरुवात केली होती. काही आमदारांनी मतदार संघात फिरता येत नसल्याचे पाहून मुंबईतच तळ ठोकला. तर काहींनी राजीनामे न देता, मंत्रालयासमोर उपोषणाचा स्टंट केला. मराठा समाजाला आरक्षण देता यावे, त्या अनुषंगाने सरकारने पावले उचलत आरक्षणासाठी शिष्टमंडळ तयार करून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू केली. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी प्रथमता सरकारने बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, संदिपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह निवृत्त न्यायाधीश यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवले.
यानंतर जरांगे पाटील यांच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून त्यानुसार सरकारने आरक्षणासाठी वेळ मागितला. व तो जरांगे पाटील व सकल मराठा समाज यांचे कडून दोन तासांच्या चर्चेअंती देण्यात आला. समितीने दोन महिन्यांच्या आत अहवाल द्यावा. अशा अटी शर्ती टाकून सरकारला दोन जानेवारीपर्यंतचा वेळ दिला. आता समिती सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा विचार करेल.
अंतरवाली सराटी मध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील व जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले.