हरवलेल्या बालकाला तीन तासात सुखरूप दिले पालकांच्या ताब्यात चाईल्ड हेल्पलाईन व तोफखाना पोलिसांची कामगिरी
अहमदनगर (दि.२ डिसेंबर):-शनिवार दि.२ डिसेंबर रोजी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चाईल्ड हेल्पलाईन, अहमदनगर यांना तोफखाना पोलीस स्टेशनमधुन राहुल कांबळे यांना फोन आला.
पोलीस ठाणे अंमलदार यांनी सांगितले कि,त्यांना पत्रकार चौक येथे 4-5 वर्षाचा मुलगा बेवारस अवस्थेत मिळाला आहे,तो काहीही बोलत नाही तुम्ही येथे येऊन त्या मुलाची मदत करा.यानंतर चाईल्ड हेल्पलाईनचे आलीम पठाण व राहुल कांबळे हे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब तोफखाना पोलीस स्टेशनला गेले.तेथे गेल्यावर मुलाची सविस्तर माहिती घेतली.
मुलासोबत चर्चा केली तेव्हा असे निदर्शनास आले कि,सदर मुलगा हा काहीही बोलू शकत नाही.यानंतर मुलाचा फोटो काढला व whatsapp, facebook ग्रुपला पोस्ट करण्यात आले कि,मुलगा बेवारस अवस्थेत आढळून आला आहे.यानंतर सदर मुलाला तारकपूर बस स्थानक,कोठला परिसर, सर्जेपुरा,प्रोफेसर चौक, लालटाकी,रामवाडी व सिद्धार्थनगर येथे शोध मोहीम सुरु झाली.चाईल्ड हेल्प लाईनच्या प्रयत्नाला शेवटी यश मिळाले व सदर मुलाचे पालक मिळून आले.
मुलाला सुखरूप पाहून आईला आपले आश्रू थांबवता आले नाही व त्या रडू लागल्या.संपूर्ण कागदपत्राची शहानिशा करून मुलाला आईच्या ताब्यात तोफखाना पोलीस स्टेशनच्या मार्फत देण्यात आले.