
अहमदनगर (दि.१० डिसेंबर):-गुन्ह्यांचे तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम,यात नगरच्या कोतवाली पोलिसांनी आपल्या कर्तृत्वातुन नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
असे असतानाच तब्बल पाऊण कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करत कोतवाली पोलिसांनी नागरिकांकडून ‘लय भारी’चा मान मिळवला आहे.त्याला कारणही तसच आहे.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा महिन्यांच्या कालावधीत चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल १२ लाख ३६ हजारांचे एकूण ७७ मोबाईल, गुन्ह्यातील जप्त ११ लाख किमतीच्या ४५ मोटरसायकल,बेवारसपणे मिळून आलेल्या वर्षानुवर्ष पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेली २७ लाख ७५ हजार किमतीची १११ दुचाकी आणि चारचाकी वाहने, गुन्ह्यात जप्त असलेले ९५ हजार किमतीचे १९ मोबाईल, सोन्या-चांदीचे ७ लाख ३५ हजार किमतीचे दागिने असा एकूण ७७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे.
पुढील काही दिवसात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आणखी सोन्या चांदीचे दागिने मूळ मालकांना परत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी बोलताना दिली.संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून महागडे मोबाईल,दुचाकी चारचाकी वाहने,सोन्या चांदीचे दागिने आदींची चोरी केली जाते.त्यामुळे या चोरी मुद्देमालाचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान समोर उभा राहते.
पोलीस निरीक्षक यादव यांनी या तपासासाठी सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. संबंधित तपासातील अंमलदारांनी विशेष मोहीम हाती घेत तांत्रिक तपास करून मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत हा मुद्देमाल नागरिकांना परत मिळवून दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी समक्ष भेटून कोतवाली पोलिसांचे विशेष आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,दीपक साबळे,तन्वीर शेख,जयश्री सुद्रिक,सलीम शेख,राजेंद्र फसले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ.राहुल गुंडू यांनी केली आहे.