
अहमदनगर (दि.१९ डिसेंबर):-पती-पत्नीच्या वादाच्या रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या खूनाचा बदला घेतला.
हि घटना पारनेर तालुक्यातील चौभूत येथे घडली आहे.याप्रकरणी पारनेर पोलीसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे याच्या विरोधात वडीलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केले असल्याची माहीती पारनेर पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.
मयत संतोष शेंडगे याने पत्नी भानूबाई व त्याच्या मधील वादाच्या रागातून रविवारी दुपारी सासू राधाबाई चोरमले यांच्या डोक्यात दगड घालून खून केला.त्याची माहीती संतोष याचा मुलगा सुभाष यास कळाल्यानंतर तो मेंढयांचा वाडा सोडून चौभूत येथे आला.व आजीचा मृत्यू झालेला असतानाही संतोष शिविगाळ करीत असल्याच्या रागातून संतापलेल्या सुभाष याने बापाच्या डोक्यात लाकडी दांडके घातले.
त्यात जखमी झालेला संतोष हा नगर येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत पावला.यासंदर्भात मयत संतोष शेडगे याची पत्नी भानूबाई संतोष शेंडगे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात मुलगा सुभाष याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.