विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कोतवाली पोलिसांचा सन्मान
अहमदनगर (दि.२३ डिसेंबर):-सिसिटीव्ही फुटेज अन् तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लावलेल्या तपासामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह तपास यंत्रनेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष कामगिरी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे या वर्षातील मुद्देमाल हस्तगत होणारी सर्वात मोठी चोरीची घटना आहे.ऋषभ सुभाष फिरोदिया (रा.आनंदऋषी हॉस्पिटल नगर) यांच्या राहत्या घरातील कपाटातील ३३ लाख रकमेच्या किमतीचे ५५ तोळे सोने, घड्याळ व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. मोठ्या रकमेच्या या गुन्ह्याचा तपास लावणे कोतवाली सोबतच अहमदनगर पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते. चोरी करताना चोरट्यांनी घेतलेल्या अधिकच्या काळजीमुळे तपासात अडथळे येत होते.या अडथळ्यांवर मात करत सिसिटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषन आणि पक्क्या गोपनीय माहितीच्या आधारे व सखोल बारकाईने तपास करून पोलीस निरीक्षक यादव व त्यांच्या टिमने या गुन्ह्यातील एक आरोपी निष्पन्न करत ५५ तोळे वजनाचे ३३ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन हा अवघड गुन्हा उघडकीस आणला आहे.
या वर्षातील हा सर्वाधिक किमतीचा तपास आहे.कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस दलाकडून कौतुक केले जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुद्धा हा गुन्हा कसा उघड उघडकीस आणला याबाबत उपस्थित सर्व अधिकारी यांना सविस्तर माहिती सांगून कौतुक केले. देण्यात आलेल्या या प्रशंसापत्रात ‘सन २०२३ वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून अहमदनगर पोलीस दलाकरता भरीव योगदान दिलेले आहे.आपली कामगिरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद असून आपण यापुढे देखील अशीच दैदीप्यमान कामगिरी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावत ठेवाल. आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपणास प्रोत्साहनपर प्रशंसापत्र प्रदान करण्यात येत आहे’ असे म्हटले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, पोलीस जवान तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, दक्षिण मोबाइल सेलचे राहुल गुंडू आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.