
राजूर (प्रतिनिधी):-मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता प्रयत्नांची पराकाष्ठा करा,मनात मोठे स्वप्न ठेवा,मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचा की ज्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळेल. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करीत राहा.अपयशातून मिळालेले यश भविष्याचा सुकर मार्ग दाखविते असा विश्वास सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.मनोहरराव देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिरातील वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी देशमुख बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते होते.यावेळी माजी प्राचार्य शिवाजी फटांगरे,नानासाहेब खर्डे,सचिव टी.एन.कानवडे, विवेक सदन,एम.एल.मुठे, प्रकाश टाकळकर,मिलिंद उमराणी,श्रीराम पन्हाळे, माधवी मुळे,डॉ.नीता भारमल, रजनी टिभे,एल.पी.परबत, डी.डी.साबळे,सदाशिव गिरी, सुनील पाबळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय उपक्रमात विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.तुम्ही तुमच्या आई वडिलांचे ड्रीम आहात. त्यांचे ड्रीम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक चांगला विद्यार्थी व्हायचे आहे असा दृष्टीकोन मनात बाळगणे सर्वात महत्वाचे आहे. सर्वोत्तम होण्याच्या प्रक्रियेत एक पाउल पुढे टाकणे गरजेचे आहे.सर्वोत्तम होण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी दीर्घकाळ सराव करण्याची गरज आहे.तसेच शिक्षकावर निष्ठा ठेवणे गरजेचे आहे.तुमचा प्रामाणिकपणा व चिकाटी, निष्ठा यातूनच तुम्ही यशस्वी ठरणार आहात.आत्मविश्वास आणि सातत्याने शिकत राहण्याचे प्रयत्न यावरच तुम्ही यश संपादन करू शकता. वार्षिक पारितोषिक वितरण हा विद्यार्थांना स्मृती आणि चालना देणारा क्षण आहे.
यामुळे यश अपयश हा भाग नगण्य समजून मुलामुलींनी स्पर्धेत व सह शालेय उपक्रमांत नेहमी सहभाग घ्यावा,असे आवाहन माजी प्राचार्य शिवाजी फटांगरे यांनी केले.आदिवासी दुर्गम भागातील मुला- मुलींना घडविण्याचे काम सत्यनिकेतनच्या माध्यमातून पाटणकर विद्यालय करीत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी प्रास्ताविक केले.सचिव टी.एन. कानवडे,कोषाध्यक्ष विवेक मदन,अभियंता नानासाहेब खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.संतराम बारवकर यांनी सूत्रसंचालन केले,तर उपप्राचार्य धतुरे यांनी आभार मानले.