अहमदनगर (दि.३० जानेवारी):-अवैधरित्या तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमास जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.
बातमीतील हकीकत अशी की,नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना रुईछत्तीसी गावामधे शिवतेज पान शॉप येथे एक इसम अवैधरित्या तलवार बाळगत असून गावात दहशत निर्माण करत आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने सपोनि/गीते यांनी नमूद ठिकाणी जावून खात्री करुन कार्यवाही करणे कामी एक पथक नेमले.
त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रुईछत्तीसी गावात जावून शिवतेज पान शॉप समोर गाडी थांबवून टपरीच्या समोर जावून पानटपरीची खात्री करुन टपरीत बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव श्रीकांत सपाटे (रा.रुईछत्तीसी ता.जि.अहमदनगर) असे सांगितले.पानशॉपची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता टपरीचे दक्षिण बाजूला असलेल्या लाकडी रॅकचे खालील बाजूस रॅकच्या आतमधे एक लोखंडी तलवार आढळून आली दोन पंचांसमक्ष पोलिसांनी तलवार ताब्यात घेवून जप्त केली.
नगर तालुका पोलीस स्टेशनला पोकॉ/संभाजी बोराडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव भोसले यांच्या सूचनेनुसार व सपोनि/प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि/युवराज चव्हाण,पोकॉ/संभाजी बारोडे,पोकॉ/राजू खेडकर पोकॉ/सागर मिसाळ यांनी केली आहे.