
सोलापूर (दि.९ मार्च):-महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग,कुष्ठरोगी वगैरेसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करावा सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाज सेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत यासाठी शासनाने सन १९७१-७२ पासून त्या व्यक्तींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार समाजभूषण पुरस्कार योजना सुरू केलेली आहे.
याच योजनेतून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सारोळे या गावातील श्री.विठ्ठल अण्णा पाथरूट यांना मरणोत्तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.सामाजिक कार्य करताना विठ्ठल पाथरूट यांनी कायम गोरगरीब नागरीकांना मदत केली त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या,तसेच मोहोळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता.