Maharashtra247

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान 

अहमदनगर (दि.१२ मार्च):-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२२- २३ चा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना प्रदान करण्यात आला आहे.दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन,अहमदनगर यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून आज नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, जमशेदजा भाभा नाट्यगृह, नरीमन पाँईट,मुंबई येथे आमदार संजय सावकारे व सुमंत भांगे,मा सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आला.

याप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना डॉ.अभिजीत दिवटे, संचालक (वैद्यकीय), डॉ. दीपक अनाप, प्रकल्प समन्वयक व डॉ. अभिजित मेरेकर प्रशासकीय समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहमदनगर तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय विकास व पशूसंवर्धन मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील (अध्यक्ष व विश्वस्थ: डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्थ: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर) यांनी सर्वांचे अभिनंदन केले व वरील पुरस्कार हा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. तसेच डॉ. विखे पाटील फाउंडेशन, अहमदनगर व जनसेवा फाउंडेशन, लोणी हे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सदैव सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर राहील असे वक्तव्य केले.

हा पुरस्कार मिळाल्याने एकप्रकारे अजून भरीव कार्य करण्यास बळ मिळाले आहे. दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचा आणि विविध क्षेत्रात त्यांचा ठसा उमटविण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्याचा वारसा हा येथून पुढेही असाच निरंतरपणे जपला जाईल असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आणि फाउंडेशन मार्फत केल्या जाणाऱ्या कार्यात ज्या सर्वांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे आणि जे अद्यापही आपल्या परीने शक्य ते योगदान देत आहेत त्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन केले. तसेच येथून पुढे अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन देखील केले.

You cannot copy content of this page