Maharashtra247

महर्षी कर्वे यांच्या प्रेरणेची उमा शंकर बनाच्या निर्मितीतून अंशतःउतराई

 

अहमदनगर (दि.22 जुलै):-“भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहाच्या केलेल्या पुरस्कारामुळे प्रभावित होऊन आपले वडील स्व.शंकर अवचट यांनी मुंबईत परिचारिकेचे काम करणाऱ्या उमाबाई तथा माई गंधे यांच्याशी धाडसाने विवाह केला.

माई यांनी सावत्र मुलांना पोटच्या मुलांप्रमाणेच सांभाळून स्वतःचे वात्सल्य सिद्ध केले”,असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पांडुरंग शंकर अवचट यांनी केले.स्नेहालय संस्थेच्या मानसिक आरोग्यावरील मानसग्राम प्रकल्पात आपल्या आई- वडीलांच्या स्मरणार्थ वयाच्या नव्वदीतील अवचट गुरुजी यांनी उमा-शंकर बन हा पर्यावरण प्रकल्प उभा करण्यात पुढाकार घेतला.त्याचे लोकार्पण आज गुरुजींच्याच हस्ते झाले.यावेळी गुरुजी म्हणाले की,या वन प्रकल्पाच्या निमित्ताने महर्षी कर्वे यांचे ऋण अंशतःफेडत असल्याची आपली भावना आहे.स्नेहालय संस्थेच्या मानसग्राम प्रकल्पातील मानसिक आजारी मनोयात्रींसाठी नारायणगाव (जि.पुणे) येथील अवचट गुरुजी यांनी आर्थिक सहयोग दिला.आपल्या आईच्या अनेक आठवणी यावेळी अवचट गुरुजी यांनी सांगितल्या.

गुरुजी म्हणाले की,घराची आर्थिक परिस्थिती ८५ वर्षांपूर्वी खालावली.घरात खायला अन्न देखील नव्हतं,तेव्हा आई उमाबाई हिने स्वतःचे सर्व दागिने आणि आयुष्याची कमाई सावत्र मुलांची पोट भरायला मोडली.शिकायला आपण बाहेरगावी गेल्यावर आईने काबाड कष्टाने शेती सांभाळली.नव्याने आयुष्य जगण्याची संधी महर्षी कर्वे यांनी सुरू केलेल्या विधवा विवाहाच्या प्रबोधन चळवळीने मिळाल्याची तिला आजन्म कृतज्ञता होती,असे अवचट गुरुजी म्हणाले.

यावेळी गुरुजीसोबत त्यांचा मुलगा नारायणगाव येथील विवेकानंद क्लासेसचे संचालक दिनेश त्याची पत्नी सौ. मुग्धा अवचट कुटुंबीयांना स्नेहालयाशी जोडणारे स्नेहालयचे पालक मनीष घोलप, मानसग्राम प्रकल्पातील स्वयंसेवक दीपक पापडेजा,सौ.वृषाली गोखले,सुवर्णा भालेराव, पूजा दहातोंडे,वैशाली घोरपडे,हरिदास घोडेस्वार,प्रदीप मोकळे, अक्षय सजगुरे,रमाकांत दोड्डी,समन्वयक भारत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page