
अहमदनगर (दि.३१ जुलै प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खडकी येथे कारखान्यात मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे बनविण्यात येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी या परिसरात छापा टाकून शस्त्र बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील खडकी भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्र, तलवारी बनवणारा कारखाना सुरु आहे. त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकी येथे जावून पहाणी करत होते. इतक्यात पोलीस आल्याची चाहुल लागतात संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे व बक्या ऊर्फ महेश म्हस्के हे दोघे तेथून आपल्या हातील मोबाईल व बनवलेल्या ९ तलवारीसह इतर साहित्य तिथेच टाकून पळवून गेले.
पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.यात ९ नवीन तयार केलेल्या तलवारी, हत्याराला धार देण्यासाठी लागणार्या ७ चकत्या,लोखंडी ऐरण, हातोडा,दोन मोबाईल असा सर्व मिळून 1१८ हजार ९०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.हि कारवाई कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मधुकर भांगरे,किशोर कुळधर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
