डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील आयटीआय नगरच्या ६१ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड
नगर दि.१९ (प्रतिनिधी):-पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन,विळद घाट येथील आयटीआयचे ६१ विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवडले गेले आहेत. संस्थेच्या आयटीआयमधील विद्यार्थ्यांना चाकण येथील लुकास टीव्हीएस कंपनी आणि अहमदनगर येथील कायनेटिक इंजिनिअर या कंपनीमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
११ आणि १३ सप्टेंबर रोजी या दोन्ही कंपन्यांकडून अहमदनगर एमआयडीसी परिसरात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतींमध्ये एकूण ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी ६१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये फिटर विभागातून १०, इलेक्ट्रिकल १९, मशिनिस्ट २४, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ६ आणि वेल्डर विभागातून २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्राचार्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आणि सांगितले की,आजच्या काळात तांत्रिक शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.तांत्रिक कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी मिळत आहेत.शिक्षण पूर्ण होताच नोकरीची संधी मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत आहे.” आयटीआयचे ठिकाण एमआयडीसीमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा फायदा होत आहे.संस्थेने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आणि आधुनिक यंत्रसामग्री पुरवली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महसूल मंत्री आणि संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर पी.एम. गायकवाड, डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, डेप्युटी डायरेक्टर सुनील कलापुरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आणि संस्थेच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. डॉ. विखे पाटील आयटीआयच्या या यशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे. यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविण्यासाठी प्रयत्नशील होतील.