धारदार तलवारी बाळगणारा भिंगार कॅम्प पोलिसांच्या जाळ्यात दोन तलवारी जप्त
अहिल्यानगर दि.३१ प्रतिनिधी):-धारदार तलवारी बाळगणा-या इसमास भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,दि.31 ऑक्टोबर 2024 रोजी भिंगार पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांना गोपनीय माहिती मिळाली की, नगर-सोलापूर रोड वरील मुठ्ठी चौकाजवळ एक इसम धारदार तलवारी विक्री करण्यासाठी येणार आहे.आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि/जगदीश मुलगीर यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना खात्री करून नमुद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावला असता थोड्या वेळातच बातमीतील वर्णनाप्रमाणे एक सम संशयीतरित्या सोलापूर रोडने हातामध्ये एक प्लॅस्टीकची गोणी घेऊन पायी येताना दिसला.
त्याचे आजुबाजुस पोलीस असल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याला जागीच पकडून पंचासमक्ष गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन धारदार तलवारी मिळून आल्याने त्यास विश्वासात घेऊन सदरच्या तलवारी कशासाठी आणल्या असे विचारले असता त्या विक्रीसाठी आाणलेल्या आहेत.असे सांगितल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव स्वप्निल विठल वारे (वय 19वर्षे,रा.भगवान बाबा मंदिराजवळ,सारसनगर, अहिल्यानगर) असे सांगितले.सदर इसमाने जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर इसमा विरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरनं. 760/2024 भारतीय हत्यार कायदा कल्लम 4/25 व भारतीय न्याय संहिता कलम प्रमाणे 223 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ.दिपक शिंदे,रवी टकले,संदिप घोडके,प्रमोद लहारे,समीर शेख,अमोल आव्हाड यांनी केली आहे.