अहिल्यानगर (दि.5 मे प्रतिनिधी):-राजघाट येथून निघालेल्या सद्भावना ज्योतीचे स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे उद्या मंगळवार दि.6 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता स्वागत केले जाणार आहे.विश्वमित्र योगेशभाई माथूरिया या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत.जगातील सर्व खंडातील 50 हून अधिक देशात बुद्ध, गांधी, नेल्सन मंडेला ,भगवान महावीर आदी महापुरुषांचे आणि प्रेषितांचे विचार जनसामान्यात पोहोचविण्यासाठी योगेश भाई यांनी सातत्याने पदयात्रा काढून प्रबोधन केले आहे.

दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधी यांची समाधी आहे. येथे एक अखंड प्रेरणा ज्योत तेवत असते. हा अग्नी आपल्या लामण दिव्यात प्रज्वलित करून योगेश भाईनी राजघाट येथून आपल्या सहकाऱ्यांसह सद्भावना ज्योती यात्रेला प्रारंभ केला.योगेश भाईनी स्थापन केलेल्या रवी कुसुम आश्रमात (तालुका पुरंदर ,जिल्हा पुणे येथील ) शांती – सदभावनेची आणि अहिंसेची ज्योत याच ज्योतीने प्रज्वलित केली जाणार आहे.ही ज्योत घेऊन उद्या सायंकाळी योगेश भाई स्नेहालय पुनर्वसन संकुलात येत आहेत.सायंकाळी 6 ते 6.30 या वेळेत स्नेहालय पुनर्वसन संकुल येथील रवींद्रनाथ टागोर सभागृहात ज्योतीचे स्वागत आणि शांती सदभावनेची प्रार्थना विविध सामाजिक संस्थांतर्फे आयोजिण्यात आली आहे.दि. 9 मे 2025 रोजी रवी कुसुम आश्रम ,तालुका पुरंदर ,जिल्हा पुणे येथे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते जयेश भाई पटेल, सुधीर भाई गोयल आणि अजय पांडे यांच्या उपस्थितीत या प्रेरणा ज्योतीचे स्थायी स्वरूपातील प्रज्वलन होणार आहे.
