अहिल्यानगर (दि.६ प्रतिनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन जगताप कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी श्री. फडणवीस यांनी स्व.अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
स्व.अरुणकाका जगताप यांनी जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व केले आणि अनेक नेतेदेखील त्यांनी घडविले. जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांनी विधान परिषदेतही दोनवेळा नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनाने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विक्रमसिंह पाचपुते,आ.संग्राम जगताप,सचिन जगताप, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.