निमगाव खैरी ते नाऊर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व नियमित बससेवा चालू ठेवण्यासाठी जनसेवा मंडळ व ग्रामस्थांचा पुढाकार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन
श्रीरामपूर (ता.१३ जुलै प्रतिनिधी):-श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी ते नाऊर हा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून जागोजागी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून,एस.टी. महामंडळाची बससेवा वारंवार बंद अथवा रद्द केली जात आहे.या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “जनसेवा मंडळ, नायगाव” आणि नायगाव ग्रामस्थांनी एकत्र येत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे काल झालेल्या प्रवरानगर येथे जनता दरबार दरम्यान निवेदन सादर करण्यात आले.
दीपक अण्णा पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देताना श्री सुभाष लांडे पाटील, बाळकृष्ण भोसले पाटील, साईनाथ लांडे पाटील, बाबासाहेब राशिनकर अविनाश लांडे, कैलास आदमने, ॲड. प्रशांत राशिनकर, तसेच जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व नायगावचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची बाजारपेठांशी जोडणी, व रुग्णांची दवाखान्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता गंभीरपणे बाधित झाली आहे. त्यामुळे रस्ता तातडीने डागडुजी करून मजबूत करावा व एसटी सेवा नियमित सुरू राहील, याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.ना.विखे पाटील यांनी लोकहिताच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून घेण्याचे सांगितले व रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल असे आश्वासित करण्यात आले.
