प्रा.किसन चव्हाण यांची याचिका..शेवगाव दंगल प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यावर चौकशीचे आदेश..उच्च न्यायालयाने दिले निर्देश
(प्रतिनिधी):
14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकी दरम्यान शेवगाव शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोपांनंतर आता या प्रकरणात मोठी न्यायालयीन कारवाई झाली आहे.त्या दिवशी प्रा.चव्हाण हे नियोजित दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते.त्यांनी सकाळी ७.३० वाजता शेवगाव सोडले व रात्री १०.३० च्या सुमारास परतले.मात्र दरम्यानच्या काळात घडलेल्या दंगल प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके,उपाधीक्षक अजित पाटील,पोलीस निरीक्षक विलास पुजारी व पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करत प्रा. चव्हाण यांनी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.कोर्टाने यातील तथ्य मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला.पुढे प्रा. चव्हाण यांनी CRPC 156(3) अंतर्गत भादंवि व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार वरील अधिकाऱ्यां विरोधात अर्ज दाखल केला.यावर अहमदनगर सत्र न्यायाधीश लोणे साहेबांनी पोलीसांनी आपले म्हणणे नोंदवावे असा आदेश दिला.मात्र दोन वर्ष उलटूनही शेवगाव पोलीस आपली बाजू कोर्टात मांडण्यात अपयशी ठरले.
यामुळे प्रा.चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत शेवगाव पोलीसांना त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑगस्ट 2025 रोजी अहमदनगर सत्र न्यायालयात होणार असून प्रा.चव्हाण यांच्यातर्फे ऍड. दीपक शामदिरे,ऍड.कृणाल सरोदे व ऍड.किरण जाधव हे कामकाज पाहत आहेत.