बळीरामपूर ग्रामपंचायतमध्ये रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार..एकाच घरातील पाच ते सहा लोकांची नावे..संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तीव्र जनांदोलन- सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र जमदाडे
नांदेड (प्रतिनिधी):- नांदेड जिल्ह्यातील मौजे बळीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत बळीरामपूर गावात सन 2021-22, 2022-23,2023-24 मध्ये रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकाच घरातील पाच ते सहा लोकांचे नावे टाकण्यात आली असून या लोकांची पहिलेच आरसीसी घरे आहेत. त्यांच्या नावे काम न करता शासकीय निधी घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे.यामध्ये शासनाची फसवणूक करून शासनाचे नुकसान होऊन गरजूंना लाभ मिळालेला नाही.पंचायत समिती बांधकाम विभाग कनिष्ठ आरेखक किंवा संबंधित इंजिनिअर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहमतीने संबंधित लाभार्थी यांच्याशी सहमत होऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 10 हजार ते 15 हजार रुपयांचा मलिदा मागून त्यांची नावे प्रधानमंत्री आवास योजना परिपत्रक क्रमांक ड यादी वगळून परस्पर मनमानी पद्धतीने यादीत नाव टाकण्यात आले आहेत.
तसेच ज्यांची आरसीसी व पक्के घरे आहेत त्यांचे बांधकाम न करता त्यांना परस्पर बिले देण्यात आले आहे. तसेच लाभार्थींकडून घरकुलाची अर्धी रक्कम बांधकाम विभाग यांनी गैरमार्गाने घेऊन खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे.तरी याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र हनुमंतराव जमदाडे हे आक्रमक होत त्यांनी नांदेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन बळीराम ग्रामपंचायत अंतर्गत रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन हडप करण्यात आलेला शासकीय निधी वसूल करण्यात यावा एकाच कुटुंबातील अनेक लोकांची नावे वगळण्यात यावीत तसेच त्या संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळेस जमदाडे यांनी दिला आहे.