शहराच्या स्वच्छतेसाठी ८० नव्या घंटागाड्या दाखल; ‘हायजिन फर्स्ट’च्या सौ.वैशाली गांधी यांच्या हस्ते शुभारंभ..नागरिकांचा सहभागच ‘स्वच्छ अहिल्यानगर’ अभियानाला यशस्वी करेल आ.संग्रामभैय्या जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहराला स्वच्छतेच्या दिशेने नवा आयाम मिळाला आहे.शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ८० नव्या घंटागाड्या आजपासून शहरवासीयांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.या सेवेचा शुभारंभ ‘हायजिन फर्स्ट’ संस्थेच्या संस्थापिका सौ.वैशाली गांधी यांच्या हस्ते वाडिया पार्क येथे उत्साहात पार पडला.या प्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.संपत बारस्कर,माजी महापौर श्री.बाबासाहेब वाकळे,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

🧹 स्वच्छतेच्या दिशेने मोठे पाऊल
“देशातील स्वच्छ शहर इंदोर प्रमाणे आपले अहिल्यानगरही स्वच्छ ठेवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे,” असे मत व्यक्त करत आमदार संग्राम भैया जगताप यांनी या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला.त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून महानगरपालिकेला ८० नव्या घंटागाड्या मंजूर झाल्या असून, त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणालीत मोठा बदल घडणार आहे. या नव्या गाड्यांमुळे प्रत्येक प्रभागात नियमित आणि वेळेवर कचरा संकलन होणार आहे.
♻️ नागरिकांनी घ्यावा सक्रीय सहभाग
अहिल्यानगर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे तर नागरिकांचा सहभागही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.“सर्व नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून तो या घंटागाड्यांमध्येच टाकावा. शहराची स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,”असे आवाहन संग्राम भैय्या जगताप यांनी केले.
⚠️ कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
शहरातील काही भागांमध्ये रस्त्यांवर किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध आता महानगरपालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.“मी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जे नागरिक रस्त्यावर, नाल्यांमध्ये किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकतील, त्यांच्यावर तातडीने कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,”असे संग्रामभैय्या जगताप यांनी ठामपणे सांगितले.
🚛 शहर विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न
स्वच्छते सोबतच शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांनाही वेग दिला असून, अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र कार्यरत आहेत.“तुमचा सक्रिय सहभागच या ‘स्वच्छ अहिल्यानगर’ अभियानाला यशस्वी करेल,असे सांगत आमदार संग्रामभैया जगताप यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला.
👥 कार्यक्रमात मान्यवरांची मोठी उपस्थिती
या शुभारंभ सोहळ्यास आयुक्त श्री.यशवंत डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संपत बारस्कर,माजी महापौर श्री. बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर श्री. गणेश भोसले, उपायुक्त श्री.संतोष टेगळे,स्थायी समितीचे माजी सभापती श्री. किशोर डागवाले,तसेच मा. नगरसेवक श्री.अनिल बोरुडे, माजी उपमहापौर श्री.दीपक सूळ, माजी नगरसेवक श्री.मनोज कोतकर,स्थायी समिती माजी सभापती श्री.कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक श्री.अविनाश घुले, माजी नगरसेवक श्री.संजय चोपडा,सौ.रेश्मा आठरे, माजी नगरसेविका सौ.लता शेळके, माजी नगरसेवक श्री.निखिल वारे, माजी नगरसेवक श्री.सचिन जाधव, श्री.शिवाजी चव्हाण यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌆 “चला, मिळून बनवूया स्वच्छ व सुंदर अहिल्यानगर!”
स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाल्याने शहरात नवी उर्मी संचारली आहे. स्वच्छ अहिल्यानगर, सुंदर अहिल्यानगर हा नारा नागरिकांच्या मनामनात रुजत असून, या मोहिमेमुळे अहिल्यानगर लवकरच राज्याच्या स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रस्थानी येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
