शेवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!निवडणुकीपूर्वी रात्रीचा ‘ऑलआऊट’ थरार..शस्त्र,दारू,जुगार,मावा विक्रेत्यांवर कारवाई..!
शेवगाव (प्रतिनिधी):-आगामी शेवगाव नगरपरिषद निवडणुका पूर्णपणे शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शेवगाव पोलिसांनी राबवलेल्या मध्यरात्रीच्या ‘ऑलआऊट ऑपरेशन’ने शहर हादरले.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरू झालेल्या आणि २४ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत गुन्हेगारीवर मोठा धडक देत विविध बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई करण्यात आली.ऑलआऊट दरम्यान आर्म्स अॅक्ट अंतर्गत एका इसमाकडून तलवार जप्त करून कायद्याचे दात दाखविण्यात आले.अवैध दारू व्यवसायावर सुद्धा पोलिसांनी धाड घालत दारूबंदीच्या ५ कारवाया केल्या असून ११,२६५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच,जुगार अड्ड्यांवर धडक देत ३ ठिकाणी छापे टाकण्यात आले.यातून ११,३०० रुपयांचे जुगार साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अवैध मावा विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करत ५,००० रुपयांचे सुगंधित तंबाखू व साहित्य जप्त करण्यात आले.मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२ अंतर्गत एका आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.याशिवाय, नॉन-बेलेबल वॉरंटमधील ८ आरोपींना अटक करण्यात आली असून बेलेबल वॉरंटमधील ८ जणांना वॉरंट बजावणी करण्यात आली.तसेच न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या १९ साक्षीदार व आरोपींना समन्सची बजावणी पार पाडण्यात आली.पोलिसांच्या यादीतील ६ हिस्ट्रीशीटर आरोपींची तपासणी करण्यात आली.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली असून निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची इशारा देण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्यासोबत ४ अधिकारी आणि २५ पोलीस अंमलदारांनी केली. यावेळी शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले की,निवडणुकी दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला जाणार नाही यापुढेही अशा धडक कारवाया सुरूच राहतील.
