कर्मयोगिनी साधनाताई आणि बाबा आमटे पुनर्वसन संकुलाचे स्नेहालयात लोकार्पण..! वंचितांच्या आशा-विश्वाला नवे पंख देणारा २ डिसेंबर रोजी भव्य उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वंचित,निराधार आणि सेवाव्रतींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या “कर्मयोगिनी साधनाताई आणि महामानव बाबा आमटे भवन” या अत्याधुनिक पुनर्वसन संकुलाचे लोकार्पण मंगळवार,2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होत आहे.सामाजिक कार्य आणि मानवसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारे हे संकुल लोकसहभागातून उभारले गेलेले आदर्श मॉडेल ठरणार आहे.स्नेहालयाच्या अध्यक्षा जया जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार या भव्य कार्यक्रमास सामाजिक कार्यातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

यात मानवलोक संस्थेच्या संघटक सौ.कल्पना लोहिया आणि अनिकेत लोहिया,द नेदरलँड येथील आधार फॉर यू संस्थेचे संस्थापक सौ.वृंदा व गिरीश ठाकूर,नगर जिल्हा भुमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अविनाश मिसाळ, तसेच नगर शहराचे पोलीस उपाधीक्षक डॉ.दिलीप टिपरसे यांचा मान्यवर म्हणून सहभाग अपेक्षित आहे.स्नेहालयातील 18 वर्षांवरील लाभार्थी तसेच सेवाव्रतींच्या सुरक्षित,सुसज्ज आणि सन्माननीय निवासासाठी हे पुनर्वसन संकुल उभारण्यात आले आहे.आधुनिक सुविधा,शिस्तबद्ध देखभाल,आरोग्य-शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आणि पुनर्वसनाला चालना देणारी व्यवस्था ही या संकुलाची वैशिष्ट्ये ठरणार आहेत.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना सामाजिक समस्यांची सद्यस्थिती आणि त्यावर होणाऱ्या उपाययोजना, समाजातील बदलत्या गरजा आणि मानवसेवेतील नव्या वाटा या विषयांवर मान्यवरांचे मूल्यवान चिंतन ऐकण्याची संधी मिळणार आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संगीता सानप
(जनसंपर्क विभाग, स्नेहालय संस्था)
M. 9011020178
