डोळ्यांत उजेड..भविष्याला दृष्टी…! तब्बल ११०० विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी..लायन्स क्लब ऑफ अहमदाबाद आवकार टिमच्या वतीने गरजू मुलांना चष्म्यांचे वाटप
अहमदाबाद (प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दृष्टी आरोग्य महत्त्वाचे असते,याच उद्देशाने लायन्स क्लब ऑफ अहमदाबाद आवकार टिम यांच्या वतीने आणि अध्यक्षा स्वाती देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ‘साईट फॉर किड्स’ अंतर्गत भव्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर ४ सप्टेंबर रोजी श्रीमती जी.जी. आय.कॅन्टोंमेंट स्कूल,अहमदाबाद (गुजरात) येथे उत्साहात पार पडले.

या शिबिरात तब्बल ११०० विद्यार्थ्यांची डोळ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, मोबाईल व स्क्रीनचा अति वापर टाळण्याचे महत्त्व, योग्य प्रकाशात वाचन करण्याच्या सवयी याबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, त्यामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात आले.या सामाजिक उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आसरवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती दर्शना वाघेला उपस्थित होत्या. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य विजय यादव, सुदाम मचंलवार (DEO), गुजरात सर्कल, लायन्स (IPDG) जिगींशा कंसारा, सेक्रेटरी कल्पना चव्हाण, डॉ. रोहित मेहता तसेच लायन्स मेडिकल टीम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. अध्यक्षा स्वाती देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.या नेत्रतपासणी शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी दृष्टी आणि नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, लायन्स क्लबचा हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरत आहे.
