सुपा गावाच्या जीवावर उठलेली गॅस पाइपलाईन उखडून टाकल्या शिवाय मनसे गप्प बसणार नाही मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांचा इशारा
सुपा (प्रतिनिधी):-सुपा–पारनेर रोड लगत पाण्याच्या पाईपलाईन प्रमाणेच अतिशय बेजबाबदार व धोकादायक पद्धतीने टाकण्यात येत असलेली गॅस पाइपलाइन तात्काळ उखडून टाकण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा स्पष्ट इशारा मनसेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे.सुपा गावालगत तसेच सुपा–पारनेर रोडच्या साईड पट्टीवर मुरूम टाकून,कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.ही पाइपलाइन केवळ सुपा गावातील नागरिकांसाठीच नव्हे, तर या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालक व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारी आहे.रस्त्याची दुरवस्था,अपघातांची शक्यता आणि गॅस गळतीसारख्या संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी संबंधित एजन्सीने नियम धाब्यावर बसवून काम सुरू केल्याचा आरोप करत,या बेकायदेशीर कामाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.तसेच रस्त्याचे नुकसान करून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एजन्सीची यंत्रसामग्री जप्त करून तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी,अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.
या संदर्भात पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही आणि गॅस पाइपलाइन काढून टाकली जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागे हटणार नाही, असा निर्धार अविनाश पवार यांनी व्यक्त केला आहे.जर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुपा गावाच्या व रस्ते सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही,तर मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील,असा ठोस इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
