सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या सद्भावना..सायकल यात्रेला नांदेड येथून बुधवारी आरंभ
अहिल्यानगर (दिनांक 29 डिसेंबर 2025):-मराठवाड्यातील संवेदनशील जिल्ह्यात सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या सद्भावना सायकल यात्रेस येत्या बुधवारी 31 डिसेंबर 2025 रोजी आरंभ होत आहे. स्नेहालय आणि समविचारी संस्था आणि संघटनांनी याचे आयोजन केले आहे.नांदेड येथील सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा येथे सकाळी 8 वाजता यात्रेची सुरुवात होईल.नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , किनवट ( जिल्हा नांदेड)येथे गेली तीन दशके साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून गरिबांना वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे, दैनिक प्रजावाणी चे संपादक शंतनु आणि धनंजय डोईफोडे आदीं सायकल यात्रेस हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती संयोजक हनीफ शेख, विकास सुतार, अँड. श्याम आसावा, जयाताई जोगदंड आदींनी दिली.

सोमवार,12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी ( राष्ट्रीय युवक दिनी ) सकाळी 10 वाजता यात्रेचा समारोप अहिल्यानगर मधील स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे होईल. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह काही प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे स्नेहालय संस्थेतर्फे डॉ. प्रीती भोंबे, राजीव गुजर , मनीषा संजय गुगळे, गीता कौर,सपना आसावा यांनी सांगितले.तरुणाईस सेवाकार्याची दिशा आणि प्रेरणा देण्यासाठी *युवानिर्माण* हा प्रकल्प स्नेहालय मागील 25 वर्षांपासून राबविते.वर्ष 2009 पासून राज्य ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल यात्रांचे आयोजन स्नेहालयने केले. तरुणाईला विविध सामाजिक प्रश्न समजावेत, सामाजिक संस्था बघता याव्यात, बदल घडवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या थेट भेटी व्हाव्यात , समविचारी तरुणाईशी चर्चेची संधी मिळावी असे यामागे उद्देश आहेत .सध्या जाती – धर्म – भाषा- प्रांत – लिंग इत्यादी आधारांवर रुंदावत चाललेले भेदा , द्वेष आणि हिंसा याविरुद्ध यात्रेतून समाजमन जागृत केले जाणार आहे.
त्यासाठी पथनाट्य,संतांची भजने, प्रेरणादायक गीते, थेट लोकसंवाद अशी माध्यमे वापरली जाणार आहेत.सायकल यात्रा 1 जानेवारी 2026 रोजी वसमत आणि हिंगोली,2 जानेवारी रोजी औंढा नागनाथ आणि परभणी,3 जानेवारी रोजी गंगाखेड आणि परळी वैजनाथ ,4 जानेवारी रोजी रेणापूर आणि लातूर,5 जानेवारी रोजी औसा आणि धाराशिव ,6 कळंब आणि मानवलोक ( अंबाजोगाई ),7 जानेवारी रोजी अंबाजोगाई परिसर ,8 जानेवारी रोजी केज आणि बीड ,9 जानेवारी रोजी पाटोदा आणि जामखेड ,10 जानेवारी रोजी चौंडी आणि कर्जत,11 जानेवारी रोजी श्रीगोंदे आणि 12 जानेवारी रोजी अहिल्यानगर असा प्रवास सायकल यात्री करणार आहेत. यात्रेत विविध विषयात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, प्रत्यक्ष समाजात सेवाकाम करणाऱ्या महिला आणि मुली सहभागी आहेत.सायकल यात्रेत 13 ते 74 वर्षांचे पूर्णवेळ 50 यात्री आहेत. याशिवाय प्रत्येक गावातील हौशी तरुण-तरुणी यात्रेसोबत 10 किलोमीटर सायकल चालवणार आहेत. दररोज संध्याकाळी सर्वधर्म प्रार्थना यात्री करणार आहेत. जातीय आणि धार्मिक संघर्ष घडलेल्या ठिकाणी त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.या संदर्भात अधिक माहितीसाठी 9011026472 येथे संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे…
संगीता सानप,स्नेहालय M.9011020178..
