शहरात पुन्हा दहशत..!..नगरसेविकेच्या पुतण्यास बंदूक दाखवत ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मागील भांडणाच्या कारणावरून नगरसेविकेच्या पुतण्याला पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडला असून,या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संकेत संदीप पाटील (वय २३) याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी संकेत पाटील हा आपले मित्र शादाब कलीम सय्यद व सुनील राजू माचरेकर यांच्यासोबत रात्री शेकोटी करून बसला असताना,त्याच ओळखीचे चिराग नन्नवरे व साहील दीपक पवार हे तेथे आले. सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर दोघांनी मागील भांडणाच्या कारणावरून संकेत पाटील याला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.एवढ्यावरच न थांबता, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दोघांनी त्यांच्या कंबरेला असलेले पिस्तूल काढून संकेत पाटील याला दाखवले.
दोघेही मारण्याच्या उद्देशाने आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच,प्रसंगावधान राखत संकेत पाटील तेथून तात्काळ पळून गेला.जीव वाचवण्यासाठी केलेल्या या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.घटनेनंतर संकेत पाटील याने तात्काळ आपले चुलते रवी पाटील तसेच भाऊ सिद्धांत पाटील यांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली,असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी चिराग नन्नवरे व साहील पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे,यापूर्वीही फिर्यादीच्या कार्यालयाच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करत रेकी करण्यात आली होती आणि ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, “माझा पुतण्या वेळेवर पळून गेला नसता, तर त्याचा खून झाला असता.ही घटना अतिशय गंभीर असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून कठोर कारवाई करावी,” अशी प्रतिक्रिया रवी पाटील यांनी व्यक्त केली आहे.या घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
