प्रभाग ८ मध्ये शिवसेना उमेदवारांची शक्तिप्रदर्शनात्मक पदयात्रा..‘शिंदे गट’ शिवसेनेचा दमदार प्रचार हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने वार्ड क्रमांक ८ मध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रियांका मनोज प्रभुणे (प्रभाग ८ अ),पुनम अतुल लगड (प्रभाग ८ ब) आणि नवनाथ मच्छिंद्र कातोरे (प्रभाग ८ क) यांच्या संयुक्त प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ही भव्य प्रचार पदयात्रा गणेश चौक,बोल्हेगाव फाटा, आदर्श नगर,पितळे कॉलनी व आंबेडकर चौक या प्रमुख भागांतून काढण्यात आली.

पदयात्रे दरम्यान शिवसेनेच्या घोषणा,भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.या पदयात्रेत हजारो शिवसैनिक, पदाधिकारी,महिला कार्यकर्त्या व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा संकल्प मांडला.

परिसरातील रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता,आरोग्य,महिला सक्षमीकरण तसेच मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.स्थानिक नागरिकांनी देखील उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या भव्य पदयात्रेमुळे वार्ड क्रमांक ८ मध्ये शिवसेनेची ताकद आणि संघटनात्मक बळ पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
