संभाजीनगर मध्ये खळबळ…भाजपा प्रदेश कार्यालयाच्या नावावर उमेदवारास धमकीचा फोन..प्रभाग ३ मधील उमेदवार चव्हाण पती-पत्नी भयभीत..पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून राहुल प्रेमराज भोसले या व्यक्तीने आता तुमचा निकालच लावतो,तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप प्रभाग क्रमांक ३ मधील समाज विकास आघाडीचे उमेदवार संदीप उत्तमराव चव्हाण व त्यांची पत्नी प्राची संदीप चव्हाण यांनी केला आहे.याबाबत त्यांनी दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी तत्काळ पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारीत नमूद केल्यानुसार,फिर्यादी संदीप चव्हाण व प्राची चव्हाण हे सुशिक्षित असून ते आपल्या कुटुंबासह कुतुबपुरा,विद्यागेट परिसरात वास्तव्यास आहेत. सन २०२६ मध्ये होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष गटातून समाज विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.५६ वाजता, संदीप चव्हाण हे स्मार्ट सिटी निवडणूक विभागात असताना त्यांना ९३७२३३३३२० या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव राहुल प्रेमराज भोसले असल्याचे सांगत, “तू भाजपच्या विरोधात काम का करतोस, तुझा आता बेत बघतो” असे म्हणत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.इतकेच नव्हे तर संबंधित राहुल भोसले याने उमेदवार संदीप चव्हाण यांच्या पत्नी प्राची चव्हाण यांनाही फोनवर शिवीगाळ करत, “तू काय करणार आहेस, तुला आता सांगतो” असे म्हणत दमदाटी केली.तसेच सदरील व्यक्ती भोसले याने त्याच्या फेसबुक पेजवर संदीप चव्हाण यांचा फोटो टाकून अर्वाच्य भाषेत लिखाण केले आहे.या धमक्यांमुळे फिर्यादी दांपत्य व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे फिर्यादी दांपत्य तसेच त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी धमकी देणारा राहुल प्रेमराज भोसले तसेच भारतीय जनता पार्टीशी संबंधित व्यक्तींवर राहील,असेही दिलेल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी ठाम मागणी संदीप चव्हाण व प्राची चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
