केक ऐवजी ज्ञानदान..! मुलीच्या वाढदिवसानिमित्त बत्तीसे कुटुंबीयांनी निमगाव शाळेला भेटवस्तू,मिष्टान्न भोजन देऊन आदर्श उपक्रम राबवीला ..
श्रीरामपूर (वार्ताहर):शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ते एक कुटुंब आहे, या भावनेतून विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी, सहज आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची प्रक्रिया रुजावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगाव खैरी येथे विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे.
सामान्यतः वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटपाची प्रथा असून, त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम व अनावश्यक खर्च लक्षात घेऊन शाळेत ‘माझा वाढदिवस – माझी समृद्ध शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेस उपयुक्त भेटवस्तू, झाडे, कुंड्या, पुस्तके व लेखनसाहित्य देऊन शाळेच्या विकासात हातभार लावत आहेत.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पावनदिनी वाढदिवस असलेल्या कु. अंकिता दत्तू बत्तीसे (इयत्ता तिसरी) हिचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व सामाजिक बांधिलकी जपत शाळेत साजरा करण्यात आला. कु. अंकिता ही निमगाव खैरी गावचे वाघाई माता देवी ट्रस्टचे विश्वस्त संतोष बत्तीसे व गणेश बत्तीसे यांची पुतणी तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ दत्तू बत्तीसे यांची कन्या आहे.या निमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांना लापशी, व्हेज पुलाव व जिलेबी असे मिष्टान्न भोजन देण्यात आले.याशिवाय, शाळेसाठी धान्य कोठी, झाडू, स्वच्छतेचे साहित्य आदी उपयुक्त वस्तू देण्यात आल्या. सुमारे ५,००० रुपये खर्च करून हा अनोखा व समाजोपयोगी वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस, महेंद्र साबळे, मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका प्रतिभा तोरणे, मीना निकम, सुधा गमे, तसेच अंगणवाडी सेविका अनिता काजळे, अर्चना पंडित, बेबीताई ढोबळे, आरती सोनवणे, राधाबाई निमसे, अनिता निमसे, कु. अंकिताची आई ललिता बत्तीसे व आजोबा पुंजाराम बत्तीसे उपस्थित होते.या स्तुत्य उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, शिक्षण विस्ताराधिकारी दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर, सरपंच दत्तात्रय झुराळे व उपसरपंच विजयसिंग परदेशी यांनी विशेष अभिनंदन केले.
इतर पालकांनीही कु. अंकिताच्या या प्रेरणादायी उपक्रमातून आदर्श घ्यावा व शाळा विकासासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा-संतोष वाघमोडे,मुख्याध्यापक
