कंदुरीत रक्तपात..! थेट गोळीबार करून खून करणारा आरोपी LCB च्या जाळ्यात अडकला असा…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नेवासा तालुक्यातील चांदा गावात कंदुरीच्या धार्मिक कार्यक्रमाला आलेल्या तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून,या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अटक केली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दि.११ जानेवारी २०२६ रोजी शाहिद राजमहंमद शेख (वय २२,रा.चांदा,ता.नेवासा) हा आपल्या मित्रांसह चांदा परिसरात कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेला होता.कार्यक्रमा दरम्यान शाहिद शेख याचा सुरज लतीफ शेख व अक्षय बाळु जाधव यांच्यासोबत आर्थिक व्यवहार व जुन्या वादातून वाद झाला.वादाचे रूपांतर क्षणात हिंसाचारात झाले.
वादाच्या भरात आरोपींनी गावठी कट्ट्याचा वापर करून शाहिद शेख याच्या छातीवर गोळी झाडली.गंभीर जखमी अवस्थेत शाहिद शेख याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने कंदुरीच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.या प्रकरणी यासीन इब्राहिम शेख (रा. चांदा) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट ३/२५, ७, २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतःघटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.LCB पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू ठेवला असता, १३ जानेवारी २०२६ रोजी आरोपी सुरज लतीफ शेख हा बाभळेश्वर (ता. राहाता) परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ सापळा रचत कारवाई केली. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सुमारे १ किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.तपासा दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह शाहिद शेख याचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील अक्षय बाळु जाधव व सुरज कैलास उबाळे हे दोघे अद्याप फरार असून,त्यांचा तसेच गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्ट्याचा शोध सुरू आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.
👮♂️ ही कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.किरणकुमार कबाडी, सपोनि हरिष भोये,पोउपनि दिपक मेढे,महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, विजय पवार,गणेश लोंढे,फुरकान शेख,दिपक घाटकर,बाळासाहेब नागरगोजे,सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर,किशोर शिरसाठ,सागर ससाणे,रोहित येमुल,बाळासाहेब गुंजाळ,योगेश कर्डीले,प्रशांत राठोड,प्रमोद जाधव,उमाकांत गावडे,अरुण मोरे तसेच महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांनी पार पाडली.
