नशेच्या अवैध धंद्यावर एलसीबीचा घाव!नशेच्या इंजेक्शन-बाटल्या विक्री करणाऱ्यावर शहरात मध्यरात्री कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन व बॉटल्या विक्री करणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकून तब्बल 11 हजार 613 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील नशेच्या अवैध व्यवसायावर मोठा आघात बसला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन व अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, गणेश लबडे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, रोहित येमुल, अमोल आजबे, उत्तरेश्वर मोराळे तसेच महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांचा समावेश असलेले पथक शहरात अवैधरित्या नशेची विक्री करणाऱ्यांची माहिती घेत असताना दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास बागडपट्टी परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली.सिध्देश्वर मंदिराजवळ एक इसम डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता न येणारे औषध व नशेची इंजेक्शन-बॉटल्या कुरिअरद्वारे मागवून विक्रीसाठी थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ छापा टाकत रोहित रघुनाथ वांगर (वय 25, रा. बागडपट्टी, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.
पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 37 बॉटल्या असा एकूण 11 हजार 299 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/164 गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 50/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125 व 278 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली असून, शहरातील नशेच्या अवैध व्यवसाया विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
