अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगरसह नाशिक विभागातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये सत्तेच्या सर्वोच्च पदांसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली असून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष बैठका आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.या निर्देशांनुसार अहिल्यानगर, नाशिक,धुळे व जळगाव महानगरपालिकेत दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता,तर मालेगाव महानगरपालिकेत ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठका पार पडणार आहेत.महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील,अशी तरतूद असून त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेला प्रशासनाकडून काटेकोर देखरेख राहणार आहे.नवनिर्वाचित सदस्यांमधून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्याच प्रमाणे धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धुळे महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते या विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान,अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठीही ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तर दुसरीकडे मालेगाव महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीमुळे संबंधित महानगरपालिकांतील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून संख्याबळाची गणिते जुळवली जात आहेत. सत्तेचा किल्ला कोणाच्या ताब्यात जाणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून येत्या दोन दिवसांत महानगरपालिकांच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
