अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोस्ट ऑफिसमधील फिक्स डिपॉझिट व विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे खोटे आमिष दाखवून कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील शेतकऱ्यासह गावातील तब्बल 40 ते 50 नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे,याचा तपास सुरू आहे.
याबाबत सुखदेव दगडू ठोकळ (वय 53, रा. कामरगाव) यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, बबन साहेबराव शेलार (मूळ रा. गुंफा, भातकुडगाव, ता. शेवगाव, सध्या रा. फत्तेपुर, ता. नेवासा) याने 6 जुलै 2024 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत कामरगाव पोस्ट ऑफिस परिसरात नागरिकांचा विश्वास संपादन केला.पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट तसेच इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत रक्कम दुप्पट होईल, असे खोटे आश्वासन देत शेलार याने फिर्यादी सुखदेव ठोकळ यांच्याकडून तब्बल 9 लाख रुपये उकळले. मात्र या रकमेच्या बदल्यात अधिकृत गुंतवणूक न करता बनावट नोंदी करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकाराची माहिती मिळताच ठोकळ यांनी नगर तालुका पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी (दि. 28 जानेवारी) सायंकाळी संशयित आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.दरम्यान,आरोपीने याच पद्धतीने गावातील व परिसरातील आणखी किती नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास पोलीस करत असून, फसवणुकीची रक्कम अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या ‘दुप्पट पैशांच्या’ आमिषाला बळी न पडता अधिकृत शासकीय योजनांची संबंधित कार्यालयातून खातरजमा करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
