गोवंश कत्तलीतील आरोपींशी आर्थिक लागेबांधे ठरले महागात..! लोणी पोलीस ठाण्यातील पोहेकॉ.जोसेफ सिलास साळवी निलंबित..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहाता तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने चालू असल्याबाबत व सदर ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आरोपींशी लोणी पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ/1203 जोसेफ सिलास साळवी यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने कत्तलखान्यावर कारवाई करावया बाबतची माहिती मिळाल्यानंतर कत्तलखान्यावर कारवाई करत नसल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली होती.ममदापूर,ता.राहाता जि. अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने चालू असल्याचे वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवायांवरून दिसून आलेले असून बाभळेश्वर पोलीस दुरक्षेत्र या ठिकाणी कार्यरत असलेले पोहेकॉ/1203 जोसेफ सिलास साळवी यांनी ममदापूर येथील अवैध कत्तलखान्याचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक असताना प्रभावी कारवाई केलेली नसल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त अर्जांची चौकशीमध्ये मागील 1 वर्षातील ममदापूर ता. राहाता येथील प्राणिसंरक्षण अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यांची माहिती घेऊन आढावा घेतला असता ममदापूर येथील प्राणी संरक्षण अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या पोहेकॉ/1203 जोसेफ सिलास साळवी हे नियमित संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोहेकॉ/साळवी यांनी पोलीस दलामध्ये कर्तव्यावर असताना हलगर्जीपणाचे व शिस्तभंग असे पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसांत मलिन करणारे वर्तन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोहेकॉ/1203 जोसेफ सिलास साळवी नेम. – लोणी पोलीस ठाणे यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी काढले आहे.
