पालकमंत्र्यांच्या निधीला कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा चुना? पारनेरमध्ये वन उद्यानाच्या कामावरून मनसे ॲक्शन मोडमध्ये..! आधी पाण्याचा बंदोबस्त करा..नाहीतर मनसे स्टाईलने राडा होणार.. तालुकाध्यक्ष अविनाश पवारांचा थेट इशारा
पारनेर (विशेष प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यातील प्रस्तावित वनउद्यान आणि इतर विकासकामांच्या दर्जावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असला,तरी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कमालीची आक्रमक झाली असून,मनसेचे पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी अधिकारी व कंत्राटदारांना थेट आणि तीव्र इशारा दिला आहे.मनसेचे पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाचे कान टोचले आहेत. “तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आणि महत्त्वाकांक्षी वन उद्यानासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो.पालकमंत्र्यांनी नेहमीच कामाचा दर्जा उत्तम राखण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.मात्र, टक्केवारीच्या मोहात पडलेले अधिकारी आणि कंत्राटदार यांना या आदेशाचा विसर पडलेला दिसतोय.पालकमंत्र्यांच्या चांगल्या हेतूला या भ्रष्ट साखळीने हरताळ फासू नये,” असे पवार यांनी पत्रकात म्हटले आहे.मनसेने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवरच थेट सवाल उपस्थित केला आहे.सुपा आणि परिसरामध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ-आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
“एकीकडे नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे,तर दुसरीकडे प्रस्तावित वन उद्यानाच्या ठिकाणी पाण्याचा कोणताही ठोस स्त्रोत उपलब्ध नाही.अशा परिस्थितीत या उद्यानातील झाडे जगवण्यासाठी पाणी कुठून आणणार? याचे उत्तर संबंधित विभागाने आधी जनतेला दिले पाहिजे,”अशी रोखठोक मागणी अविनाश पवार यांनी केली आहे.यापूर्वी झालेल्या विकासकामांचा दाखला देत मनसेने कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे वस्त्रहरण केले.नगर-पुणे महामार्गावरील स्ट्रीट लाईट पोलचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून काही ‘बालिश’ कंत्राटदारांनी जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात घालवला,अशी आठवण करून देत पवार म्हणाले की, “केवळ टक्केवारीच्या मोहापोटी आणि भविष्याचा कोणताही विचार न करता ही कामे केली गेली.आता पुन्हा पालकमंत्र्यांची दिशाभूल करून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना जर हे काम जबरदस्तीने पुढे रेटण्याचा प्रयत्न झाला,तर माळरानावर वन उद्यान फुलण्याऐवजी केवळ बालिश कार्यकर्ते,कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचे काम होईल,अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.
जनतेच्या रक्ताघामाच्या पैशांची अशी उधळपट्टी मनसे उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. प्रशासनाने तात्काळ या प्रकल्पाच्या पाण्याच्या स्त्रोताबाबत आणि कामाच्या दर्जाबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या ‘खाक्या’ दाखवून ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडेल,असा थेट इशारा तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे.या इशाऱ्यामुळे आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
