Murder..सख्ख्या चुलत्यानेच संपवला पुतण्या ..! 24 तासांत ‘एलसीबी’ ने केली गुन्ह्याची उकल..पुतण्याच्या हत्येमागचे ‘ते’ भयानक कारण ऐकून तुम्हीही हादरून जाल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे एका इसमाची निर्घृण हत्या करून घरातील रोख रक्कम आणि दागिने दरोडा टाकून पळून गेलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे.पकडण्यात आलेला आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मयताचा सख्खा चुलता असल्याचे समोर आले असून,त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेली रोख रक्कम, मोटारसायकल आणि इतर मुद्देमालासह एकूण १०,८४,०००/- रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.दि. १५ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भुजवळवस्ती,भांडगाव (ता. पारनेर) येथे राहणारे संदीप भास्कर खरमाळे यांच्या घरात घुसून एका अज्ञात आरोपीने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात हातोड्याने जबर वार केले होते.या हल्ल्यात संदीप खरमाळे यांचा जागीच मृत्यू झाला होता.आरोपीने घरातून १२,७०,०००/- रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले होते.याप्रकरणी मयताचा मुलगा सिद्धेश संदीप खरमाळे याने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) आणि ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश व मार्गदर्शन दिले.मिळालेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. हरीष भोये,संदीप मुरकुटे आणि पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव,बाळासाहेब खेडकर,मनोज साखरे,आकाश काळे,विशाल तनपुरे,रमीजराजा आत्तार,अमोल आजबे,प्रकाश मांडगे,भगवान थोरात, तसेच चालक उमाकांत गावडे व भगवान धुळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली.तपासादरम्यान संशयित आरोपी महेश हनुमंत खरमाळे (रा.भुजबळवस्ती, भांडगाव) यानेच हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.तसेच तो भांडगाव ते जामगाव रस्त्याने लाल-काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर पाठीमागे एक बॉक्स दोरीने बांधून पळून जात असल्याचे समजले.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने भांडगाव ते जामगाव रोडवरील तळ्याजवळ अत्यंत शिताफीने सापळा रचला.
संशयित आरोपी मोटारसायकलवरून येत असताना पोलिसांनी त्याला वेढा घालून ताब्यात घेतले.महेश हनुमंत खरमाळे (वय ४५ वर्षे) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता,त्याने संपत्तीच्या आणि चोरीच्या उद्देशाने आपल्याच पुतण्याच्या (संदीप भास्कर खरमाळे) डोक्यात हातोड्याने वार करून खून केल्याची कबुली दिली.अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी रोख रक्कम: १०,२९,०००/- रुपये,मोबाईल: १०,०००/- रुपये किमतीचा एक फोन मोटारसायकल: ४०,०००/- रुपये किमतीची (लाल-काळ्या रंगाची) जप्त केली आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारनेर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत. पोलिसांच्या या अत्यंत जलद आणि कौशल्याने केलेल्या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
