रयत शिक्षण संस्थेचे भालेराव सर यांचे दुःखद निधन..एका दिलखुलास शिक्षकाला विद्यार्थ्यांची भावपूर्ण श्रद्धांजली..!
संगमनेर (राजेंद्र मेढे):-चिंचोली गुरव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात आपल्या आगळ्यावेगळ्या शिकवण्याच्या शैलीने आणि दिलखुलास स्वभावाने हजारो विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले, सर्वांचे लाडके शिक्षक भालेराव सर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रासह त्यांच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे.
भालेराव सर हे केवळ एक शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांच्या तासाला वर्गात नेहमीच एक हलकं-फुलकं आणि उत्साही वातावरण असायचे. मराठी विषय शिकवताना त्यांची कविता म्हणण्याची खास पद्धत, भारताचा भूगोल रंजकपणे मांडण्याची कला आणि इतिहास जिवंत करण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांचा तास म्हणजे सर्वच मुलांचा आवडता तास असायचा.
शिक्षा करण्याची ‘ती’ अनोखी पद्धत आणि आठवणी
सरांच्या गृहपाठ आणि पेपर चेक करण्याच्या पद्धतीचे अनेक किस्से आजही विद्यार्थ्यांच्या मुखावर आहेत. ‘वहीचे दोन भाग करण्यापासून’ ते अभ्यासात हलगर्जीपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ‘डस्टर फेकून मारण्यापर्यंतची’ त्यांची शिक्षा करण्याची अनोखी पण तितकीच प्रेमाची पद्धत आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जशीच्या तशी जिवंत आहे. त्या शिक्षेमागे राग नसून विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी आणि प्रेम असायचे, अशा भावना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
शिक्षकी पेशाला न्याय देत त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर विद्यार्थ्यांना घडवण्याचे मोलाचे कार्य केले. अशा या अत्यंत मनमिळाऊ, हसऱ्या आणि अविस्मरणीय शिक्षकाला त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांकडून आणि हितचिंतकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
